औरंगाबाद - शहरात उपचार घेणाऱ्या भारत बटालियनचे 67 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज घरी सोडण्यात आले. औरंगाबादेत जवळपास 350 रुग्ण बरे झाले आहेत.
भारत बटालियनच्या राखीव पोलीस दलाच्या 74 पोलिसांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर महानगरपालिकेतर्फे उपचार करण्यात आले. त्यापैकी 67 जण बरे झाल्याची माहिती महानगरपालिका आरोग्यधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली. इतर परिसरातील 3 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत. एकूण उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 350 पर्यंत गेली आहे.
हेही वाचा-परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीची टिप्परला धडक; 4 ठार, 22 गंभीर
औरंगाबाद भारत बटालियनचे राखीव पोलीस मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्यावेळी सर्वात आधी त्यांना साहित्य देण्यासाठी गेलेल्या एका कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या औरंगाबाद येथील पोलिसांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर 6 मे रोजी भारत बटालियनची 97 जणांची तुकडी परतली होती. त्यांची हाताळलेले साहित्य आणि वाहन त्यावेळी निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयात या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विलगीकरण करण्यात आले होते. जवानातील 97 पैकी 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा-पत्नीच्या छळाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेवकाचा 'फेसबुक लाईव्ह' करुन आत्महत्येचा प्रयत्न