अमरावती - विदर्भातील संत्री ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध ( Vidarbha Orange Crop ) आहे. प्रतिवर्षी संत्र्याचे दोन बहार येतात. उन्हाळ्यात येणाऱ्या आंबिया बहारातील संत्री अतिशय चवदार आणि बागायतदारांना समृद्ध करणारी असतात. मात्र, या वर्षी उन्हाची तीव्र लाट असल्यामुळे आंबिया बहाराला मोठा फटका बसला ( Vidarbha Rising Heat Hits Orange Crop ) आहे. उन्हामुळे जवळपास पाचशे कोटी रुपयांचे आंबिया बहारातील संत्र्याचे नुकसान झाले ( Heat Hits Orange Crop At 500 Crore ) आहे. हा फटका संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडणारा असून, संत्रा उत्पादकांचा आंबिया बहार पुरता वाया गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे.
संत्रा उत्पादक हवालदिल - आज उष्णतेमुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. गत तीन वर्षांपासून संत्री उत्पादक प्रचंड तोटा सहन करीत असताना, यावर्षी उष्णतेमुळे आंबिया बहारातील 90% संत्री गळून गेली आहे. यावर्षीची परिस्थिती इतकी भीषण आहे की संत्र्यासाठी, केलेला खर्च निघणार की नाही, असा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकल्याचे चांदुर रेल्वे तालुक्यातील संत्रा उत्पादक प्रदीप जगताप यांनी 'ईटीव्ही भारत शी' सांगितले आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे संत्रा उत्पादकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. आता उष्णतेमुळे संत्रा गळून गेल्यामुळे भविष्यात संत्र्याच्या बागा कशा टिकावायच्या, असा गहन प्रश्न माझ्यासह सर्वच संत्रा उत्पादकांना पडला असल्याची चिंता प्रदीप जगताप यांनी व्यक्त केली आहे.
"35 एकर जागेतील संत्री गेली वाया" - आम्ही 35 एकर जागेवर संत्र्याची झाडे लावली आहेत. उष्णतेमुळे पस्तीस एकरांपैकी एकाही झाडांना आंबिया बहरात फळ आले नाही. एकीकडे प्रचंड उष्णता असताना बागेत पाणी देण्यासाठी आम्हाला योग्य असा वीज पुरवठा नाही. दुपारी बारा ते चार वाजेदरम्यान शेताला पाणी कसे द्यायचे. शेतकऱ्यांपेक्षा सरकार कारखानदारांना अधिक महत्त्व देते. त्यांना विजेचा पुरवठा आमच्यापेक्षा अधिक केला जातो, अशी खंत कौस्तुभ खेडकर या बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
"मशागतीचे पैसेही मिळणे कठीण" - कोरोनामुळे दोन वर्ष चांगलाच फटका बसला आहे. यावर्षी आता धोरणाच्या जागी उन्हामुळे आंबिया बहार खराब झाला आहे. झाडावरची संत्री मोठ्या प्रमाणात गळ आली आहे. संत्र्यावर काळे डाग पडले असून, संपूर्ण फळही वाया गेले आहेत. या वर्षी संत्रा झाडांना शेणखत देण्यासह मशागतीसाठी जो काही खर्च केला. तो खर्च निघणे सुद्धा शक्य नाही, असे शेतकरी अतुल जुमळे यांनी म्हटले आहे.
संत्रा बागायतदारांनी विमा काढला नाही - यावर्षी शेतकऱ्यांसोबतच संत्रा बागायतदारांनी विमा काढलेला नाही, अशी धक्कादायक माहिती काही शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. दर वर्षी संत्रा उत्पादकांना चार हजार रुपये हेक्टरी विमा मिळायचा. मात्र, यावर्षी विम्याचे दर हे हेक्टरी 4 हजारांवरून 13 हजार रुपये करण्यात आल्यामुळे इतकी मोठी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अशक्य होते. आता निसर्गामुळे हातचा संत्रा गेला असताना सरकारने शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचे हित अधिक जोपासल्याची खेदजनक प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
"500 कोटींचे नुकसान" - डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात संत्रा बहरासाठी तापमान अतिशय अनुकूल होते. या काळात मोठ्या प्रमाणात फुलधारणा आणि फळधारणा झाली. मात्र, 17 मार्च ते 31 मार्च दरम्यान जी उष्णतेची लाट आली. त्यामुळे तापमान 30 अंशावरुन 42 अंशापर्यंत पोहचले. फुलांचे परागीकरण होऊ शकले नाही. उष्णतेमुळे फळेसुद्धा गळाली. संत्रा उत्पादकांचे आजच्या तारखेत जवळपास पाचशे कोटी रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. मार्च एप्रिल आणि मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे आंबिया बहारातील संत्र्याची नेमकी भविष्यात काय परिस्थिती राहील याचे भाकीत करणे, आज शक्य नसल्याचे देखील प्रा. राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Kashinath Chavan : पुण्यातील काशीनाथची जर्मनीने घेतली दखल; वाचा काय आहे प्रकरण?