अमरावती - मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीत अमरावती मनपाकडून जनतेला आरोग्य सुविधा न देता केवळ जनतेकडून पैसे उकळण्याचे काम सुरु आहे. अमरावतीमधील जनतेकडून निवडून दिलेल्या नगरसेवकांनी एकदाही मनपाच्या आरोग्य यंत्रणेविरूद्ध आमसभेत आवाज उठवला नाही.
तसेच प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र अशी कोरोना महामारीसाठी आरोग्य सुविधा उभारुन लोकांना या संकटातून सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. दरवर्षी 800 ते 1,000 कोटींचे मनपाचे बजेट असते मग हा पैसा आरोग्य यंत्रणेवर का खर्च होत नाही, असा सवाल करत आज वंचित बहुजन आघाडीने आज अमरावती महानगरपालिकेत जाऊन डमरू बजाव आंदोलन केले व डमरू वाजवून नगरसेवकांना जागे केले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.
कोरोनामुळे खासगी रुग्णालयांचे खिसे भरले -
अमरावतीतील कोरोनाचा मृत्यूदर वाढला आणि खासगी रुग्णालयाचे खिसे भरले. आज शहराची लोकसंख्या आठ लाखाच्या जवळ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवायचे सोडून दोन प्राथमिक आरोग्य केंद्र या भ्रष्ट व्यवस्थेने गिळंकृत केली. डॉक्टर, परिचारिका, मदतनीस यांची संख्या वाढवायचे सोडून नियमबाह्य पद्धतीने खाजगी कोविड हाॅस्पिटल वाढवले व मनपा अधिकारी मलाई खात राहिले. आज शहरात मनपाची स्वत:ची रुग्णवाहिका नाही, फिरते रुग्णालय नाही, कोरोना व विविध चाचण्यांसाठी प्रयोगशाळा नाही, एक्स रे मशिन नाही, स्वतंत्र अशी ब्लड बँक नाही, डेंन्टल क्लिनिक नाही. तरीही जनतेकडुन मनपा टॅक्स घेतच आहे. दर वर्षी 800 ते 1,000 कोटींचे मनपाचे बजेट असते मग हा पैसा आरोग्य यंत्रणेवर का खर्च होत नाही, असा सवाल देखील वंचितने केला आहे.