अमरावती - अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात कोरोना सारख्या आजाराने व्यापारीवर्ग हवालदिल झालेला आहे. त्यातच प्रशासनाने ठरवून दिलेली वेळ व संचारबंदी, अशा परिस्थितीमध्ये शहरातील व्यापारी चिंताग्रस्त आहे, अशाही परिस्थितीत आता चोऱ्या होत असल्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडत आहे. एकाच रात्री चांदूर रेल्वे शहरात ४ दुकानात व तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे एका पानठेल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चांदूर रेल्वे पोलीसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित अवघ्या काही तासांतच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असुन त्याच्याजवळून पुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शुक्रवारच्या (दिनांक २६) मध्यरात्री घडली. यामध्ये अजुनही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असुन पोलीस शोध घेत आहे.
अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल-
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री चांदूर रेल्वे शहरातील आठवडी बाजाराजवळील कुंदन बुट हाऊसमध्ये चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी पंकज रूपराव नेरकर यांनी सकाळी चांदूर रेल्वे पोलीसांत दाखल केली होती. त्यांच्या दुकानातुन २ हजाराचा माल चोरी गेला. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला. यानंतर काही वेळाने पुन्हा रात्रीतच जानवानी सिमेंट डेपो (मेन मार्केट रोड), गणेश धान्य भांडार (आठवडी बाजार), सुपर मोबाईल शॉपी (जुना मोटार स्टँड) व रामलखन पानठेला (मांजरखेड कसबा) येथे सुध्दा चोरी झाल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना देण्यात आली.
यानंतर चांदूर रेल्वे पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवित सकाळीच अवघ्या काही तासांतच यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला मांजरखेड येथील शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरी केलेले ६ मोबाईल व ७ मोबाईल बॅटरी किंमत अंदाजे ९० हजार रूपये, २ हजार रूपयांचा माल व अंदाजे २ हजार रूपये रोख व चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.
पायातील नवीन बूट वरून आरोपीला पकडले-
सर्वात पहिले आरोपीने चांदूर रेल्वे शहरातील एक बूट हाऊस चे दुकान फोडले. अशी तक्रार आल्यानंतर चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांनी सकाळीच कोणाच्या पायात नवीन बूट किंवा चप्पल असेल किंवा कोणाजवळ नवीन बूटांची थैली वगैरे आढळल्यास माहिती द्यावी, असे गुप्त माहिती देणाऱ्यांना सांगितले. त्यावरून एक मुलगा लंगडत मांजरखेड (कसबा) परिसरातील शेतामधून जात असुन पायात नवीन बूट आहे व थैली सुध्दा आहे, अशी माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना सकाळीच दिली.
यानंतर ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात पोलीस स्टाफने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबूली दिली. त्यामुळे चोरी केल्यानंतर आरोपीने पायात नवीन बूट घातला व त्या नवीन बूटावरूनच या चोरीचा छडा लागल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा- रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अमरावतीमधील लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला