अमरावती - विदर्भाची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या अमरावती शहरातील नाट्यक्षेत्रावर कोरोनामुळे संकट ओढवले आहे. त्यामुळे रंगमंचावर शुकशुकाट पसरला आहे. नाट्यस्पर्धा, नाट्य नाट्यशिबीर, बालनाट्य शिबीर असे उन्हाळभर राबविले जाणारे उपक्रम यावर्षी होऊ शकले नाही. अशा या संकटाच्या परिस्थितीत केवळ नाटक हेच आयुष्य असणाऱ्या अनेक कलाकारांना या परिस्थितीत आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे.
अमरावती शहरात अद्वैत नाट्य संस्थेसह, अभिरुची, नटराज, जिगिशा, जनजागृती, आझाद हिंद मंडळ, अंबापेठ कला व क्रीडा मंडळ, पीपल्स कलमांचा आशा अनेक नाट्य संस्था आहेत. या विविध नाट्यसंस्थासोबत शेकडो कलावंत जुळले आहेत. कामगार कल्याण मंडळाशी सुद्धा अनेक कलावंत जुळले असून अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह, टाऊन हॉल येथील रंगमंच अगदी ओसाड पडला आहे.
रंगमंचावर कला सादर करणाऱ्या कलावंतांसह नैपथ्यकार, मेकअप आर्टिस्ट, संगीत मंचातील कलावंत असा बराच गोतावळा या नाट्यक्षेत्राशी जुळलेला आहे. नाटकाशिवाय जगणे शून्य असेही काही नाट्यक्षेत्राला वाहून घेणारे कलावंत अमरावतीत आहेत. ज्यांचा उदरनिर्वाह हा केवळ नाटकावर चालतो. जिल्हा परिषदेच्या अनेक उपक्रमांबाबत जनजागृती करण्यासाठी वर्षभर किमान बारा- पंधरा पथनाट्य सादर होतात. या पथनाट्याद्वारे मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेवरही समाधानी आयुष्य जगणारे कलावंतही अमरावतीत आहेत.
हिवाळ्यात सुरू होणाऱ्या विविध पातळीवरील स्पर्धांपासून उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालय सुरू होईपर्यंत अमरावतीच्या नाट्य क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने होतात. यावर्षी कोरोनामुळे इतर सर्व क्षेत्राप्रमाणे अमरावतीच्या नाट्य क्षेत्रावरही संकट कोसळले आहे. स्थानिक कलावंतांचे उन्हाळ्यात जवळपास 5 ते 6 व्यावसायिक नाटकांचे नियोजन होते. यसह विविध संस्थेद्वारे नाट्य शिबिराचे आयोजन होणार होते. हे सारे काही कोरोनामुळे रद्द झाले. नाट्यक्षेत्रात पथनाट्य असो वा महानाट्य प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेक्षकांच्या गर्दीशिवाय कशालाही महत्व नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करणे हा मोठा धोका असल्यामुळे नाट्यक्षेत्र पार कोलमडून पडले आहे.
या परिस्थितीत अमरावती शहरातील अनेक कालावंतांवर ओढवलेल्या आर्थिक संकट काळात ' आपला जिल्हा' आपला कलावंत, आपली मदत' या नावाखाली अद्वैत संस्थेचे प्रमुख विशाल तराळ यांच्या पुढाकाराने विविध संस्थेशी जुळलेले नाट्यकर्मींनी अमरावती जिल्ह्यातील गरजू नाट्य कलावंतांची यादी तयार केली. दोनशेच्या जवळपास अडचणीत असणाऱ्या आर्थिक कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना लोकप्रतिनिधींसोबतच प्रेक्षक मायबापांकडून मदतीची अपेक्षा आहे. नाटकावरच ज्यांचे पोट आहे, अशा कलावंतांची दखल शासनाने देखील घ्यावी, अशी मागणी देखील केली असल्याचे विशाल तराळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. कोरोनासोबत सर्व समाज जगायला शिकत असताना अशा परिस्थिती नाट्यकर्मी पुन्हा रंगमंचावर कसा येईल, पुन्हा एकदा नाटकाला प्रेक्षकांची गर्दी कशी उसळेल, याची प्रतीक्षा किमान वर्षभर तरी करावी लागणार असे विशाल तराळ म्हणाले.