अमरावती - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत कोरोनाग्रस्तांच्या व्यवस्थेबाबत प्रशासन आणखी जोमाने कामला लागले आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णांलयात 25 खाटांची व्यवस्था असणारे कोरोनाग्रस्त असणाऱ्या गर्भवतींसाठी विशेष प्रसूती रुग्णालय सुरू होणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिली.
अशी आहे रुग्णालयांतील खाटांची स्थिती
अमरावती शहरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालयात 312 खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयातील 87 खाटा सोमवारी रिकाम्या झाल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे 214 खाटांपैकी 113 खाटा रिकाम्या झाल्या होत्या. अचलपूर येथील कोविड-19 सेंटरवर 40पैकी 21 खाटा रिकाम्या आहेत. मोझरी येथे 100 पैकी 95 खाटा रिकाम्या आहेत. दर्यापूर आणि मोर्शी येथील सर्व 40 खाटा रिकाम्या होत्या. यासोबतच अमरावती शहरातील दहाही खासगी रुग्णालयात सोमवारी 219 खाटा रिकाम्या होत्या, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना रुग्णांसाठी अमरावतीत आज खाटांची व्यवस्था आहे. असे असले तरी, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता येथील विभागीय क्रीडा संकुलात 200 खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचे नियोजन आहे. लवकरच याठिकाणी कोविड-19 रुग्णालय सुरू होणार, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.