अमरावती - कोरोनामुळे ( Corona ) सलग दोन वर्ष सुरळीत नसलेली शाळा 2022- 23 या शैक्षणिक वर्षात आजपासून जिल्ह्यात चिमुकल्यांच्या नव्या उत्साहासह सुरू झाली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांसाठी ( students ) नवी उपक्रमाची मेजवानी राहणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
विद्यार्थी शिक्षक सर्वच उत्साही - शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आज अमरावती शहरातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकही चांगलेच उत्साहात दिसले. पालकांनी आपल्या चिमुकल्यांना मोठ्या आनंदाने सकाळी छान तयारी करून शाळेत आणले. इयत्ता पहिली आणि दुसरीतील अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत आले होते. मात्र, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून, तसेच नवे पुस्तक देऊन त्यांना अगदी आनंदमय वातावरण मिळाल्यामुळे शाळेत पहिल्यांदाच आलेले सर्व चिमुकले अतिशय आनंदात बागडत होते. अनेक शाळांमध्ये वर्ग शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढून तसेच खाऊ देऊन स्वागत केले.
शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीवर भर - कोविड-19 च्या प्रभावामुळे सलग दोन वर्षात विद्यार्थ्यांचा अध्ययन त्रास झाला आहे. तो भरून काढणे टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि त्याआधारे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी करणे हे शैक्षणिक क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख 'ई टीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका, खाजगी अशा सर्वच शाळा आजपासून सुरू होत आहेत. या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाळेला भेट देऊन पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. यासाठी आम्ही निमंत्रण दिल्याचे प्रिया देशमुख म्हणाल्या. मेळघाटातील शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आज आनंदाचा दिवस - मागील दोन वर्ष शाळा व्यवस्थित झालीच नाही. आता कोरोनाचे संकट पुन्हा येणार नाही, अशीच प्रार्थना आम्ही ईश्वराकडे करतो. आज शाळेत चिमुकले विद्यार्थी आल्यामुळे शाळेचे वातावरण पूर्णतः भरले आहे. आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस असून शाळेतील प्रत्येक शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा असल्याचे आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल विरूळ म्हणाल्या.
वर्ग खोल्या सजल्या" नव्या पुस्तकांचे वाटप - आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शहरात सर्वच शाळांमधील वर्गखोल्या सजवण्यात आले आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. शाळा सुरू झाली याचा आनंद पालकांनी देखील व्यक्त केला आहे.
हेही वाचा- 'राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया'; दिलीप वळसे- पाटील यांची माहिती