अमरावती - पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले असून अशा आरक्षणामुळे हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या आरक्षणाच्या विरोधात 'सेव्ह मेरिट' आशी घोषणा देत आज शेकडो नागरिकांनी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
आज (मंगळवारी) सकाळी 8 वाजता 'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन'चे कार्यकर्ते आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या घरासमोर पोहचले. यावेळी घंटा, ताट, वाट्या वाजवून आरक्षणाचा निषेध नोंदविण्यात आला. राज्य सरकारने वाढविलेले आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे, इअरमार्किंग पध्द्त पूर्णतः बंद व्हावी, कुठलेही आरक्षण विना अट असू नये, आरक्षण कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 50 लाखाचा बॉण्ड द्यावा व त्या बदल्यात 5 वर्ष ग्रामीण भागात सेवा द्यावी, पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण असू नये, शिक्षण आणि नोकरीत एकदाच आरक्षण मिळावे, बढतीमध्ये आरक्षण असूच नये. आरक्षण केवळ शासकीय शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत मर्यादीत असावे. आशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख यांना सादर करण्यात आले. डॉ. सुनील देशमुख यांनी विषयांचे गांभीर्य मला कळले आहे. मात्र, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. सेव्ह मेरिट - सेव्ह नेशनच्या मागण्या मी विधानसभेत मांडेल असे आश्वासन देखील आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी दिले आहे.
या आंदोलनात नीलेश परतानी, डॉ. अविनाश चौधरी, सुनील पांडे, सुधा तिवारी, डॉ. नीरज मुरके, ज्योती परतानी, रश्मी नावंदर, अलका सप्रे आदी उपस्थित होते.