अमरावती - जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील घुईखेड गावालगत कारची ट्रकला समोरा समोर धडक बसली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातमध्ये दोन जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खड्डा चुकविण्याचा नादात हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.
अनिल सारंगधर चेंडकापुरे हे आई, पत्नी व मुलांसोबत नागपुरवरून घुईखेडकडे कारने (एमएच ४९ यु ३४०९) ने जात होते. दरम्यान, घुईखेडजवळील खारवगळ नाल्याजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रकची (एमएच १७ बीडी ९७४३) समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कार चालवित असलेले अनिल चेंडकापुरे आणि त्यांचा ४ वर्षीय मुलगा कबीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी प्रज्ञा चेंडकापुरे हिचा पुलगाव येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आई लिलाबाई चेंडकापुरे यांचा सावंगी मेघे रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजते. चेंडकापुरे कुटुंबीय हे मुळचे चांदूररेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील आहे. ते सद्या नागपुरातील गोटाळ पांजरी (कस्तुरीनगर) परिसरात राहतात.