अमरावती - अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. दिवसभर काम करून थकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे, पुरुषांबरोबरच महिला कर्मचाऱ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे.
हेही वाचा - अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात चालक वाहक कर्मचाऱ्यांसाठी रात्रपाळी निवासासाठी असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये स्वच्छतागृहे आहेत. मात्र या स्वच्छतागृहांची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी एसटी कर्मचारी आराम करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असून अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. रेस्ट हाऊसला असलेली दारे - खिडक्या तुटल्या असल्याने महिला असुरक्षित आहेत.
दीड हजारांहून अधिक कर्मचारी संपावर
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह आदी मागण्यांसाठी तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी संपावर गेल्याने एसटीची चाके थांबली आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, चांदुर बाजार, मोर्शी आणि वरुड आगारातील एसटी सेवा पूर्णता बंद आहे. जिल्ह्यातील 350 पैकी केवळ 60 ते 70 बसेस रस्त्यावर धावत आहेत.
एसटी महामंडच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसह एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. आज अमरावती जिल्ह्यातील दीड हजार कर्मचारी संपावर गेल्याने एसटीची सेवा पूर्णत: खोळंबली. भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी दुसऱ्या गावाला जात होते. परंतु, एसटीची सेवा कोलमडली असल्याने तासनतास बसची वाट पाहत प्रवाशी आगरामध्ये उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा - दिवाळीच्या पर्वावर भाविकांना मिळतो 'पैशांचा प्रसाद', अमरावतीच्या कालीमाता मंदिरातील प्रथा