अमरावती - रतन इंडिया कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पात कार्यकरत कामगारांचा मोर्चा आज अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकला. रतन इंडिया कंपनीकडून स्थानिक मजुरांवर अन्याय केला जात असून किमान वेतनवाढ मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कामगारांनी यशोमती ठाकूर यांना सादर केले.
अशा आहेत मागण्या
- कंपनीने किमान वेतन कायद्याच्या निकषाप्रमाणे मूळ पगार व त्यावरील वाढ एकरकमी द्यावी. तसेच पगारातून कपात करण्यात आलेली रक्कमही एकरकमी देण्यात यावी.
- नियमित व कंत्राटी कामगारांचे कुशल, अर्धकुशल अशी यादी जाहीर करावी.
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शैक्षणिक योग्यतेप्रमाणे नियुक्तीपत्र द्यावे.
- अधिकाऱ्यांसह कामगार नियुक्ती करताना 80 टक्के स्थानिक आणि 20 टक्के बाहेरील कामगार असा नियम करावा.
- नियमित, कंत्राटी व परराज्यातील कामगारांना सारखा मोबदला देण्यासाठी व संघर्ष टाळण्यास शासन, कामगार संघटना व व्यवस्थापन प्रतिनिधी आदींचा समावेश असलेली समिती गठीत करावी.
'बैठक घेऊन तोडगा काढणार'
रतन इंडिया कंपनीचे सुमारे दोनशे ते अडीचशे कामगार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी धडकले होते. कामगारांचे निवेदन स्वीकारून आणि नेमका प्रश्न जाणून घेतल्यावर यशोमती ठाकूर यांनी रतन इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकांची बैठक बोलावून याबाबत योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.