अमरावती - संयुक्त राष्ट्र संघाने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रुपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल केले.
हेही वाचा - अमरावतीत भाजपने कृषी मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे, ताफा अडविण्याचाही प्रयत्न
शहरातील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते काल सकाळी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सामाजिक वनसंरक्षक डी.पी. निकम, सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते.
वनोध्यान निर्मितीस गती द्यावी
शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र झाडे नसल्याने रुक्ष झाले होते. डम्पिंग ग्राऊंडसारखा त्याचा वापर होत होता. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रुपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांलगतच्या मोकळ्या वनजमिनींवर अशी वनोद्याने निर्माण करण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, असे निर्देश मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
सावली व प्राणवायू देणाऱ्या झाडांचे उपवन
ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात. ऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे.
बालकांसाठी स्वतंत्र उद्यान
बाळगोपाळांसाठी स्वतंत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, तिथे विविध खेळणीही उपलब्ध आहेत. पार्कच्या सर्व क्षेत्राचे निरीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण मनोराही उभारण्यात आला आहे. कॅक्टसच्या विविध प्रजातींची लागवड करून कॅक्टस व रॉक गार्डनही उभारण्यात आले आहे.
वन्यजिवांची माहिती देणारे फलक
वन्यप्राणी व पक्ष्यांची छायाचित्रे असलेले माहितीफलकही उद्यानात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
हेही वाचा - विदर्भातील कौंडण्यपुरातील रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान