अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या खासदार आदर्श ग्राम योजनेचा ( Sansad Adarsh Gram Yojana ) अमरावती जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) या डॅशिंग खासदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विकासाकरिता कुठलेही गाव दत्तक घेतले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशी आहे खासदार आदर्श ग्राम योजना : 2014 मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी खासदार आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाला आदर्श गाव बनवावे, अशी अपेक्षा होती. अशा गावात स्वच्छता राखणे, अंगणवाडीत मुलांना प्रवेश देणे, गाव झाडे लावून हरित करणे, आरोग्याच्या संपूर्ण सुविधा या गावात पुरविणे, अशी कामे खासदारांच्या वतीने करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे गावांचा वाढदिवस साजरा करून गावातील ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी शहिद कुटुंबियांचा सन्मान करणे, असे विविध कार्यक्रम खासदारांनी राबविणे या योजनेअंतर्गत अपेक्षित आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मात्र जिल्ह्यातील एकही गाव अद्याप दत्तक घेतले नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
'विरोधक म्हणतात जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या' : खासदार नवनीत राणा या नेहमीच चर्चेत राहणाऱ्या व्यक्तिमत्व आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाच्या विषयावरून त्यांचे नाव सर्वत्र गाजत असून सध्या राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्या तुरुंगात आहेत. आमच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयात हात घालण्याऐवजी जिल्ह्यातील विकास कामांकडे लक्ष दिले तर मतदारांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लागेल, असे शिवसेनेच्या जिल्हा संघटक मनिषा टेंबरे आणि युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल माकोडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. खासदार नवनीत राणा वारंवार मेळघाटात जातात. तिथे आदिवासी बांधवांना सोबत नाच-गाण्यात रमतान यापलीकडे मात्र त्यांच्या विकासासाठी काहीही करत नाही, अशी टीका देखील शिवसेनेचे राहुल मांडवडे यांनी केली आहे. आताही वेळ गेलेली नाही खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील एखादे गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना असून पंतप्रधानांच्या या योजनेला जिल्ह्यात यशस्वी करावे तसेच जिल्ह्यात खुंटलेल्या विकासाच्या कामांकडे ही लक्ष दिले तर सर्वांचेच भले होईल, अशी अपेक्षाही शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडून व्यक्त केली आहे.
'म्हणे विकासासाठी संपूर्ण जिल्हाच घेतला दत्तक' : खासदार नवनीत राणा या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचणाऱ्या एकमेव खासदार आहेत. कोणतेही एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करण्यापेक्षा जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा विकास हाच आमच्या नेत्या खासदार नवनीत राणा यांचा ध्यास असल्याचे युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हा महिला प्रमुख सुमती डोके आणि पार्टीच्या कोर कमिटी चे सदस्य बाळासाहेब इंगोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. केवळ एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्यापेक्षा खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण जिल्ह्याच विकासासाठी दत्तक घेतला आहे, असे खासदार नवनीत राणा यांचे समर्थक म्हणतात.
हेही वाचा - डिजिटल इंडियाच्या युगातही 'या' गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीठ, पाणी नसल्याने लग्नासाठी मुलीही मिळेणा
'गाव दत्तक घेण्याचे नुकतेच मिळाले पत्र' : पंतप्रधानांच्या खासदार दत्तक योजनेचे पत्र त्यांना काही दिवसांपूर्वीच मिळाले. त्यामध्ये दत्तक घेण्यासाठी काही गावांची नावे आहेत. मुंबईवरून आपण दोन दिवसात परत येऊ आणि त्यानंतर कोणती गाव दत्तक घ्यायची ते ठरवू, असे खासदार नवनीत राणा यांनी ठरवले होते. मात्र मातोश्रीवर हनुमान चालीसा पटणासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे विकासासाठी गाव दत्तक घेणे लांबले, असेही राणा समर्थकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.
देशात अमरावती जिल्ह्याचा आला होता तिसरा क्रमांक : 2019 पूर्वी जिल्ह्यात असणारे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी यावली शहिद हे गाव दत्तक घेतले होते. त्यावेळी यावली शहिद गाव हागणदारीमुक्त करून प्रत्येक घरी शौचालय बांधण्यात आले होते. गावात आणि गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर हिरवा गार बनविण्यात आला होता. पंतप्रधानांच्या खासदार आदर्श ग्राम योजनेत देशभरातून अमरावती जिल्ह्यातील यावली शहिद या गावाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता, अशी माहिती जिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा - Nana Patole : मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपची ‘बुस्टर सभा’; नाना पटोलेंची टीका