अमरावती - महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठण केल्यावर गुन्हा दाखल होतो, असे असताना आम्हाला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा, असा सल्ला औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारत आहोत. आमची काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणाची तयारी आहे. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( Chief Minister Uddhav Thackeray ) त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करावे, असे आव्हान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) दिले आहे.
'विरोधकांवर टीका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा' : महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पाणीटंचाई विजेची समस्या यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. मात्र नागरिकांच्या समस्यावर एक शब्दही मुख्यमंत्री जाहीर सभेत बोलत नाही. केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेतात. हे योग्य नाही, अशी टीकाही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
'ओवैसीबाबत गप्प का'? : औरंगाबादमध्ये येऊन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहतात. त्या संदर्भात मुख्यमंत्री जाहीर सभेत एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही हनुमान चालीसा पठण केले तर मुख्यमंत्र्यांना त्रास होतो. यामागचे काय कारण आहे? असा सवाल देखील नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.