अमरावती - मी भाजपामध्ये जाणार आशी चर्चा सुरू असते. मात्र हे असे काहीही होणार नाही. तळागाळातील लोकांसाठी काम करणाऱ्या आमच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत केवळ जिल्ह्याचा विकास साधणे हाच माझा उद्देश आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महोत्सवात खासदार राणा यांनी राजकारण मला करायचे नसून आपल्या जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष देऊन काम करायचे असल्याचे म्हटले आहे.
'मोदींच्या निकट असाल पण युवास्वाभिमानविना शून्य'
अभियंता भवन येथे आयोजित युवा स्वाभिमान महोत्सवाला संबोधित करताना आमदार रवी राणा यांनी तुम्ही सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकट असला तरी अमरावतीत युवा स्वाभिमानविना शून्य आहात हे लक्षात ठेवा, असे आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांना म्हणाले आणि सभागृहात हस्यकल्लोळ झाला.
'कोरोना लस मोफत मिळावी'
महाराष्ट्र हे सधन असे राज्य. आज मात्र अनेक छोट्या राज्यांनी नागरिकांना कोरीना लस मोफत देण्याचे जाहीर केले मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत कोरोना लसीची घोषणा करावी, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
'विमातळासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार'
सध्या अमरावतीत शासकीय महाविद्यालयाचा विषय तापला आहे. जो तो श्रेय घेण्यासाठी सरसावला आहे. मात्र वडद या गावाजवळ या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित झाली असून त्या जागेचा सात बारा हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर आहे. त्यामुळे इतर लोकप्रतिनिधींनी पूर्वी मान्य झालेल्या कामाचे श्रेय न घेता इतर नवे काही आणावे. वैद्यकीय माजविद्यालयाच्या आधी विमानतळ सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे राणा म्हणाल्या.
शहीद कैलास दहिकरच्या कुटुंबीयांची रक्ततुला
हिमाचल प्रदेशात तैनात मेळघाटातील कैलास दहिकर हे कर्तव्यावर असताना शहीद झालेत. युवास्वाभिमान महोत्सवावर शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या रक्ताची तुला शाहिद कैलास दहिकर यांच्या कुटुंबासोबत केली.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार
या महोत्सवात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील अनेक डॉक्टर, परिचारिका यांना प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले.