अमरावती - आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा ( MLA Ravi Rana and MP Navneet Rana ) हे दोघेही केवळ जनतेच्या हितासाठी आणि समाजाच्या विकासासाठी झटत आहेत. दोघेही तरुण आहेत. यामुळे जनतेच्या हितापेक्षा केवळ स्वतःचे भले पाहणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi Government ) आम्ही दोघेही खटकत ( MP Navneet Rana criticized State Government ) आहोत. या सरकारच्या दबावात येऊन महापालिका आयुक्त ( Municipal Commissioner Amravati ) तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी मी खासदार असतानाही माझा अवमान केला आहे. यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात मी संसदेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. माझा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती शहरात सध्या राजापेठ उड्डाणपुलावर आमदार राणा यांनी अनधिकृतपणे बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद उफाळून आला आहे. महापालिका आयुक्तांच्या अंगावर राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याने हा वाद चांगलाच चिघळला असताना खासदार नवनीत राणा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
- 'शहरातील अशांततेसाठी पोलीस आयुक्त जबाबदार'
अमरावती शहरात गत काही महिन्यांपासून अशांतता पसरली आहे. मी बारा वर्षात पहिल्यांदा अमरावती दंगल पाहिली आहे. शहरात वर्षभरात खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरातील अनेक भागात जुगार सुरू आहे, दारूची अनधिकृतपणे विक्री होत आहे, असे सर्व अनधिकृत कामे शहरात सुरू असताना अमरावतीच्या पोलीस आयुक्त डोळे झाकून आहेत. शहरासाठी गंभीर असणाऱ्या विषयांकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष नाही. मात्र महापालिका आयुक्तांवर शाईफेक झाल्याच्या प्रकरणात ज्यांचा कुठलाही संबंध नाही, अशांविरोधात गुन्हे दाखल करणे आणि अटक करण्यात आलेल्या आमच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कोठडीत अत्याचार करणे, अशी पोलीस आयुक्तांची भूमिका योग्य नाही, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. राजापेठ पोलीस ठाण्यात असणारे आमचे कार्यकर्ते तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी गेले असता पोलिसांनी माझ्यासोबत अरेरावी केली. हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असल्याचेही खासदार नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.
- 'माणुसकीच्या नात्याने महापालिका आयुक्तांना भेटायला गेले'
महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्याची घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेनंतर मी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. मात्र त्यांनी मला भेटण्यास नकार दिला. नवनीत राणा म्हणून त्यांनी मला भेटण्यास नकार दिला असता तर हरकत नव्हती, मात्र खासदार म्हणून मी त्यांना भेटायला गेली असता त्यांनी मला भेट नाकारली. हा खासदाराचा अवमान असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
- 'महापालिका निवडणुकीनंतर शिवरायांचा पुतळा बसवणार'
सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. आम्हाला शहरात शांतता हवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही आदर करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही उत्साहातच साजरी करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर महापालिका निवडणूकीनंतर आम्ही सत्तेत आल्यावर अधिकृतरीत्या स्थापन करू, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात सोबतच छत्री तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे स्मारक स्थापन करणार असल्याचेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
- 'महिला व बालविकास विभागातील घोटाळ्यांची व्हावी चौकशी'
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला आहेत. एक महिला म्हणून मी दुसऱ्या महिलेचा आदर, सन्मानच करते. मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या आमच्या विरोधात केवळ षडयंत्र रचतात. वास्तवात त्या मंत्री असणाऱ्या महिला व बालविकास विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. संसदेतही मी या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. महिला व बालकल्याण विभागातील घोटाळ्यांची लवकरच चौकशी होईल, असेही खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
- संजय राऊतांवर केली टीका
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत जी पत्रकार परिषद घेतली, ती जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःचे भले करण्यासाठी होती. यामुळेच त्यांनी ती पत्रकार परिषद आटोक्यात घेऊन गुंडाळली, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. आम्ही केवळ जनतेसाठी बोलतो. त्यामुळे कोणाच्याही समोर आम्ही हिमतीने उभे राहतो, असेही नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Bappi Lahiri Lesser Known Facts: मायकेल जॅक्सनलाही बप्पीदांच्या 'जिमी जिमी' गाण्याची पडली होती भुरळ