अमरावती - लाचारी पत्करूनच राज्यात काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये टिकून असल्याची टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे. केंद्रीय नेतृत्व हे राज्यात आघाडी करण्यासाठी तयार नव्हते. पण, महाराष्ट्रामध्ये भाजपला रोखण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो, असा गौप्यस्फोट बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. आता त्यावर आमदार रवी राणा यांनी ही टीका केली आहे.
दिवाळीअगोदरच महाविकास आघाडीला फटाके लागने सुरू झाले असून, बिहार निवडणुकीनंतर हे सरकार कोसळणार असल्याचे भाकीतही रवी राणा यांनी व्यक्त केले आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ज्याप्रमाणे सांगितले की, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत दुजाभाव करत आहेत. महानगरपालिका, नगर परिषदेच्या निधीसाठी काँग्रेससोबत दुजाभाव होत असल्याचे चव्हाण यांनी मांडल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
येणाऱ्या बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाघाडीची महाबिघाडी होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच आता यांना फटाके लागणे सुरू झाले असून, काँग्रेसला दुजाभाव मिळत आहे. त्याचीच खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याचेही आमदार रवी राणा म्हणाले.