अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील दलबदलू नेत्यांवर जोरदार 'प्रहार' केला आहे. भाजपात सध्या मेघाभरती सुरू आहे. अशा वेळी दहा-दहा वर्षे आमदार, खासदार, मंत्री राहिलेले नेतेही भाजपात प्रवेश करत आहेत, अशा नेत्यांना जोड्याने मारले पाहीजे अशी टिका बच्चू कडू यांनी अमरावती येथे माध्यमांसोबत बोलताना केली आहे.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही
देशात मैदानात फक्त भाजप हाच एकच पैलवान दिसत आहे. त्यामुळे आता लढाई होणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. राज्यात 10 वर्षे सत्तेत राहुन मंत्रीपद भोगलेले नेते भाजपात सत्तेसाठी प्रवेश करत आहे. सत्तेसाठी आणि फक्त आमदार होण्यासाठी पक्ष बदलणारे नेते हे लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही.
ईव्हीएमचा दुरुपयोग हा दहशतवादापेक्षाही मोठा धोका
ईव्हीएम मशीनचा जो दुरुपयोग होत आहे, तो दहशतवाद पेक्षाही मोठा धोका आहे. सामान्य माणसाचा असलेला मुलभूत अधिकारच जर हिरावला तर हे राष्ट्र हितासाठी मोठे घातक होऊ शकते. भाजपमध्ये दम असेल आणि खरच 56 इंचाची छाती असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक लढवावी.
काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तेवर आल्यावर ईव्हीएम वापरणार नाही असे शपथपत्र द्यावे
मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सध्या ईव्हीएम विरोधात एकत्र झाले आहेत. त्यांच्या सोबत जायचे की नाही तो आमच्या पक्षाचा निर्णय आहे. पण काँग्रेसवाले जर सत्तेवर आले तर त्यांनी आम्हीही ईव्हीएम मशीन स्वीकारणार नाही, असे शपथपत्र द्यावे. या शिवाय मजा येणार नाही. असा सल्ला बच्चू कडू यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला दिला आहे.
मुख्यमंत्री पदाचा वापर पक्ष बांधणीसाठी होत आहे हे मोठे दुर्दैव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही, मुख्यमंत्री पदाचा उपयोग घेऊन पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री यांचा वापर जर पक्ष बांधणीसाठी होत असेल तर हे मोठे दुर्दैव आहे. ही महाजनादेश यात्रा नसून आदेश देणारी यात्रा आहे असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.