अमरावती - उच्च शिक्षणासंदर्भात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण संस्थाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने 'मंत्रालय आपल्या शहरात' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात अमरावती शहरातून केली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज अमरावतीत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम एका वेळेस 50 जणांच्या उपस्थितीत तीन टप्प्यांमध्ये घेतला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
'अमरावतीला दिले 10 व्हेंटिलेटर्स' -
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने अमरावती शहरासाठी 10 व्हेंटिलेटर्स आज उदय सामंत यांच्याहस्ते जिल्हा आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आले. अमरावतीसह अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाण्यातही व्हेंटिलेटर्स वितरित करण्यात आले. सीएसआर फंडमधून आदित्य ठाकरे यांनी हे व्हेंटिलेटर्स दिले असून याचा दर्जा केंद्र शासनाने दिलेल्या व्हेंटिलेटर्स पेक्षा उत्तम असल्याचे उदय सामंत म्हणाले. हे व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आल्या असल्याचे सावंत म्हणाले.
'विद्यापीठाने आऊटसोर्सिंगद्वारे काम भागावावे'-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह सर्व विद्यापीठांत केवळ संवैधनिक पद भरतीला मान्यता आहे. अमरावती विद्यापीठात 325 कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. मात्र, वित्त विभागाच्या अडचणीमुळे ही पदे भरता येणे अशक्य आहे. यामुळे विद्यापीठाने आऊटसोर्सिंगद्वारे काम भागवविण्याचा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिला. विद्यापीठाच्या गोपनीय विभागात पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनीच काम करावे, अशा सूचना दिल्या जातील, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
'कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क माफ' -
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासह कोरोनाकाळात प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्क 50 टक्के घेतले जाणार असून याव्यतीरिक्त इतर सर्व शुल्क माफ करण्यात आले असल्याचे उदय सामंत म्हणाले.
'विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला 10 कोटीचा निधी' -
महाराष्ट्रातील पहिले शासकीय स्वायत्त महाविद्यालय आणाऱ्या अमरावतीच्या विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत असून या संस्थेला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्राचार्यांनी या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा - नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला