अमरावती - जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथील फिनले मील ( Amravati Mill Workers Agitation ) मागील सहा महिन्यापासून बंद आहे. ही मील सुरू व्हावी व कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी तीनशे फूट उंच चिमणीवर चढून गिरणी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.
जीव मुठीत घेत कर्मचाऱ्यांचे आंदोलन -
केंद्र शासनाच्या अखत्यारितील एनटीसी या संस्थेच्यावतीने वस्त्रोद्योगातून शेतकऱ्यांच्या कापसाला उत्तम भाव मिळण्यासाठी कापड मील चालविण्यात येते. कोरोना पूर्वी केंद्र सरकारला भरघोस निधी मिळवून देणारी ही मील आता शासनाच्या धोरणाने डबघाईस आली आहे. याच मीलच्या भरोशावर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची मुले आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मागील तीन महिन्यांपासून ही मील बंद अवस्थेत पडली असून ती सुरू व्हावी व कामगारांना पूर्ण पगार सुरू व्हावा, या मागणीसाठी गिरणी कामगार संघाच्यावतीने चिमणीवर चढून जीव मुठीत घेत आंदोलन करण्यात येत आहे.
पाच महिन्यांपूर्वीदेखील केले होते आंदोलन -
या मील कामगारांनी पाच महिन्यापूर्वीदेखील अशाच पद्धतीने तीव्र आंदोलन केले होते. परंतु तेव्हाही या कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन मागे घेण्यास लावले होते. परंतु अजूनही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.