अमरावती : अमरावती जिल्ह्यात लंपी ( Lumpy virus in Amaravati ) या रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील 12 गावातील 314 गुरांना लंपी हा कातडीचा आजार ( Lumpy Skin disease ) झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून जिल्ह्यात जनावरांची वाहतूक, आठवडी बाजार, पशु प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके ( Deputy Collector Vivek Ghodke ), पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे ( Deputy Commissioner of Animal Husbandry ) यांनी दिली.
जिल्ह्यात ३ जनावरांचा मृत्यू : जिल्ह्यात धारणी, चिखलदरा आणि अचलपूर या तीन तालुक्यातील 12 गावांमध्ये लंपी हा आजार पसरत आहे. गाय व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. रोगग्रस्त 314 पैकी 217 जनावरांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती संजय कावरे यांनी दिली. या आजारामुळे जिल्ह्यात 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुरांच्या वाहतुकीस मनाई आणि गुरांचा बाजार ही बंद करण्यात आला आहे.
लक्षणे आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन : आजाराचा फैलाव वाढू नये याकरिता पशुसंवर्धन विभागाने तातडीच्या उपायोजना केल्या आहेत. त्याकरिता गॉट पोक्स या लसीचे लसीकरण ही संबंधित गावा लगतच्या पाच किलोमीटर वरील गावात सुरू केले आहे. या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग महसूल, जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे.
काय आहे लम्पी व्हायरस ? कॅप्री पॉक्स विषाणूला लम्पी व्हायरस असेही म्हणतात. याला लम्पी स्किन डिसीज व्हायरस असेही म्हणतात. हा विषाणू पॉक्सविरिडाए दुहेरी अडकलेल्या DNA विषाणू कुटुंबातून उद्भवतो. पॉक्सविरिडाए ला पॉक्स व्हायरस देखील म्हणतात. त्याचे नैसर्गिक यजमान पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी प्राणी आहेत. या कुटुंबात सध्या 83 प्रजाती 22 पिढ्या आणि दोन उपकुटुंबांमध्ये विभागल्या आहेत. स्मॉलपोक्स देखील या रोगांच्या कुटुंबातील आहे.