अमरावती - शहरापासून 30 की.मि अंतरावर असणाऱ्या आऱ्हाड-कुऱ्हाड गावालगत आकाशातून उल्का वर्षावासारखा प्रकार होताना दिसला. रात्री 8 वाजेच्या सुमारास आकाशातून मोठा प्रकाश पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच आऱ्हाड गावातील शेतकरी प्रकाश डकरे, स्वप्नील डकरे यांनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. तीन ते चार विजेच्या शलाका एका प्रखर गोळ्यासह खाली येताना यामध्ये दिसल्या. प्रथमदर्शनी हा उल्कापात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागपूरच्या खगोल अभ्यासकांनी सॅटेलाईट पडला असण्याचीही शक्यता वर्तवली आहे.
उल्कापातच असल्याची शक्यता - हा उल्का वर्षाव असल्याचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यल्यातील प्राध्यापक डॉ. पंकज नागपुरे आणि सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. अनिल असोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. अमरावती शहरातही अनेक ठिकाणी आकाशात हे दृश्य दिसले. या उल्का जमिनीच्या दिशेने येताना मध्येच विरून जातात असेही डॉ. अनिल असोले यांनी स्पष्ट केले.
विदर्भात इतरतही दिसले दृष्य - नागपूरमध्येही काही जणांनी अशाप्रकारचा प्रखर झोत येताना पाहिल्याचे सांगितले आहे. विदर्भातील इतर काही ठिकाणच्या प्रतिनिधींनी याबाबत काही व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रथमदर्शनी या उल्का असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारे प्रशासकीय पातळीवरुन काहीही सांगण्यात आलेले नाही.
नागपूररचे खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आकाशातील एखादे सॅटेलाईट पडले असण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. अथवा एखादी मोठी उल्का असावी. कारण आज ३ उल्का पृथ्वी जवळून जाणार होत्या. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात दिसली आहे. उल्का अरबी समुद्रात पडली असण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे - न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत. ही माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.