अमरावती - किरकोळ वादातून पत्नीला मारहाण करुन नराधमाने दोन चिमुकल्यांना विष पाजल्याने खळबळ उडाली. ही घटना नांदगाव पेठमधील झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी घडली. महेंद्र सुभाष राऊत असे त्या पत्नीला मारहाण करुन चिमुकल्यांना विष पाजणाऱ्या पित्याचे नाव आहे. या घटनेनंतर त्याने देखील विष पिऊन आत्मघात करण्याचा प्रयत्न केला. यातील पाच वर्षीय मुलाची प्रकृती अत्यंत नाजूक असून, त्याच्यासह बहिणीला नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
झोपडपट्टी परिसरात असे घडले आहे प्रकरण - मंगळवारी सकाळी महेंद्रने किरकोळ वादातून आपल्याला सलाखीने मारहाण केली. तथा आपल्या आदर्श (वय ५) व अनन्या (२) या दोन मुलांना विष पाजले. त्याने देखील विष घेतल्याची तक्रार महेंद्रची पत्नी ज्योत्स्ना राऊतने (२४) नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिचा जबाब नोंदवण्यात आला. यात आदर्शची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, त्याच्यासह अनन्याला देखील नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. मुलांसोबत त्यांची आई सुद्धा नागपूरला सोबत गेली आहे.
किरकोळ कारणातून रोजच व्हायचा पती पत्नीचा वाद - नांदगाव पेठमधील माळीपुरा येथे राहणाऱ्या राऊत दाम्पत्यात नेहमीच वाद होत असत. माळीपुऱ्यासह महेंद्र हा नजीकच्या पॉवरहाऊस परिसरातील अतिक्रमित झोपडीत देखील राहत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्नाला साखळीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्यातून तणनाशक विषारी द्रव्य पाजले. त्यावेळी तो थोडादेखील घाबरला नाही. बाबा, काहीतरी पाजत आहेत, असे वाटल्याने चिमुकल्या आदर्शने ते द्रव्य प्राशन केले, अनन्याने सुद्धा ते पिऊन टाकले. मुलांना पाजल्यानंतर महेंद्रने देखील तेच तणनाशक प्राशन केले. हाकेच्या अंतरावर असलेल्या ज्योत्स्नाला ते माहीत होताच, ती दोन्ही मुलांना बिलगून रुग्णालयात घेऊन आली.
पती, पत्नी दोघांनाही केले होते रुग्णालयात दाखल - ज्योत्स्ना मुलांना घेऊन सुमारे १२.४५ च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली. तर काही प्रत्यक्षदर्शींनी महेंद्रला देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक १० मध्ये उपचार सुरू आहेत, तर ज्योत्स्नाला वॉर्ड क्रमांक १२ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, पोटचे गोळे अत्यवस्थ असल्याने स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता तिने सुटी घेतली. ती मुलांसोबत नागपूरला रवाना झाली.
कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल - याप्रकरणी महेंद्र राऊतविरुद्ध कलम ३०७ व अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल केला. घरगुती किरकोळ वादातून हा प्रसंग घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलांना नागपुरात हलविण्यात आल्याची माहिती नांदगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी दिली.