अमरावती - राज्यातील सर्व 845 ग्रामपंचायती फायबर रेंजने जोडण्यात येत आहेत. यापैकी 446 ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले असून 399 ग्रामपंचायतीचे काम लवकरच सुरू होईल. ग्रामपंचायतींमध्ये फायबर रेंज येताच त्या माहिती तंत्रज्ञानाद्वारे सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही महिन्यातच गावातील ग्रामपंचायत, शाळा आणि आरोग्य केंद्र हे माहिती तंत्रज्ञानाद्वारे समृद्ध होणार असून यापुढे गावातील व्यक्तीचे तालुका आणि जिल्हा स्तरावरील सर्व कामे त्याच्या गावातच पूर्ण होतील. असे गृहराज्य तसेच माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज अमरावतीत स्पष्ट केले आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयात सह जिल्ह्यातील नागरी सुविधा परिवहन महामंडळ या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी सतेज पाटील अमरावतीत आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
अमरावतीत लवकरच लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
अमरावती शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागावेत यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबईत पोहोचताच निर्णय घेणार असून दोन महिन्यात अमरावती शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागतील असे सतेज पाटील म्हणाले. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधीची गरज भासल्यास जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधी प्राप्त व्हावा या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सोबतही चर्चा केली जाणार असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना शहरातील व्यापाऱ्यांना आपल्या प्रतिष्ठानांवर खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही सूचना दिली आहे. तसेच, अतिशय कमी किमतीत हे कॅमेरे लागत असल्यामुळे शहराच्या हितासाठी खाजगी कॅमेरेही लागावेत असे सतेज पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा विचार करावा
राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना आम्ही कोरना काळातही संपूर्ण वेतन दिले तसेच आता ही त्यांची वेतन वाढ केली आहे. असे असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना बाबत सकारात्मक विचार करत असताना त्यांनी सुद्धा सर्वसामान्य बाबत सकारात्मक विचार करावा असे सतेज पाटील म्हणाले.
गुटक्याला आळा बसवणे पोलिसांची जबाबदारी नाही
राज्यात निश्चितपणे गुटखाबंदी आहे असे असताना अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येताच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलिसांची नसून ती अन्न व औषधी प्रशासन विभागाची असल्याचे स्पष्ट केले. अन्न व औषधी प्रशासन विभागाला कारवाई करताना कुठली अडचण येत असल्यास त्यांनी पोलिसांची निश्चितपणे मदत घ्यावी असेही सतेज पाटील म्हणाले.
हेही वाचा - शाहरुख खानचा मुलगा अबराम चाहत्यांना करतोय अभिवादन, व्हिडिओ होतोय व्हायरल