अमरावती - देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारी आणि देश स्वतंत्र झाल्यावर देश उभारण्यासाठी प्रयत्न करणारी पिढी ही आपल्या समोर आदर्श आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख अशा असंख्य चांगल्या लोकांच्या पिढीने देशाला नवी दिशा दिली. आज मात्र केवळ एका व्यक्तीच्या भरवशावर राष्ट्राला आत्मनिर्भर करण्याचे कार्य शक्य नाही. यामुळेच आत्मनिर्भर भारत हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अमरावती येथे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात केले.
राज्यपाल कोश्यारी हे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी अमरावती येथे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीला भेट दिली, तसेच त्यांनी तुकडोजी महाराज (tukdoji maharaj) यांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे थांबून राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व प्रार्थना मंदिराचे दर्शनही घेतले.
हेही वाचा - अभिनेता शिव ठाकरे कार अपघातातून सुखरुप बचावला
शेती हाच विकासाचा पाया
आज देश औद्योगिकरीत्या विकसित होत असला तरी, आपल्या भारताच्या विकासाचा खरा पाया हा शेतीच असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी हाच देशाचा विकासाचा खरा मार्ग असल्याचे जाणले होते, यामुळेच त्यांनी देशात कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडली आणि त्यांच्यामुळेच देशात कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्याचे राज्यपाल म्हणाले. आज कृषी विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या बळावर विविध प्रयोग करून आधुनिक शेतीच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्याचे आवाहन राज्यपाल यांनी केले.
नव्या कृषी महाविद्यालयाबाबत विचार सुरू
महाराष्ट्रात आता नवीन कृषी महाविद्यालयांची गरज नसल्याचे मत राज्याच्या कृषिमंत्र्यांनी व्यक्त केले होते. यासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नवीन कृषी महाविद्यालय आणखी कुठे देता येईल का? याबाबत सकारात्मक विचार मला कृषिमंत्र्यांसोबत बोलताना जाणवले. यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे प्रयत्न मार्गी लागू शकतात, अशी आशाही राज्यपाल यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
सोहळ्याला यांची उपस्थिती
श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सभामंडपात आयोजित सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले, खासदार नवनीत राणा, महापौर चेतन गावंडे, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके उपस्थित होत्या.
राज्यपालांची मोझरीला भेट, तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे घेतले दर्शन
राज्यपाल कोश्यारी हे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान अमरावतीला विविध कार्यक्रमांना जात असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे थांबून राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व प्रार्थना मंदिराचे दर्शन घेतले. 1966 मध्ये तुकडोजी महाराजांचे भजण मी प्रयागराजमध्ये ऐकले होते. त्यांनतर आज तुकडोजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाचे सौभाग्य मला लाभले असल्याची भावना यावेळी राज्यपालांनी व्यक्त केली. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी लिहिल्या आहे. त्या गोष्टी प्रत्येकाला करणे गरजेचे आहे. ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली असल्याची प्रतिक्रियाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकार्यांच्या वतीने राज्यपाल महोदयांना तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता तसेच, तुकडोजी महाराजांचे साहित्यही भेट देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दनपंत बोथे, अध्यात्म विभाग प्रमुख राजाराम बोथे, अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरीसह आदी उपस्थित होते.
हेही वाचा - अमरावती : उड्डाणपूलावरून पोलिसांवर फेकला दगड; आरोपीला केली अटक