अमरावती - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लकडाऊन सुरु आहे. मात्र, लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू असतानाच शहरातील वडाळी येथील शीखपुरा परिसरात गावठी दारू विक्रीला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे हा सारा प्रकार खुलेआमपणे सुरू होता आणि तरिही पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असे बोलले जात आहे. शुक्रवारी रात्री याच भागात दारू विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या भांडणात दिलदारसिंग टांक, मुख्तारसिंग टांक, अजयसिंग टांक, कुलदीपसिंग टांक या अवैध दारू विक्रेत्यांनी जनरल सिंग आणि गोपी सिंग यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जनरल सिंग गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा... छत्तीसगड: राजनांदगाव जिल्ह्यात चकमकीत चार नक्षलवादी ठार; एक पोलीस उपनिरीक्षक शहीद
अमरावती शहरात वडाळी भागात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती फ्रेजारपुरा पोलिसांना प्राप्त झाली. यानंतर पोलिसांचा ताफा वडाळी येथील शीखपुऱ्यात दाखल झाला. पोलीस येताच दिलदारसिंग टांक, मुख्तारसिंग टांक, अजयसिंग टांक, कुलदीपसिंग टांक या चौघांनी परिसरातून पळ काढला. पोलिसांनी यावेळी तीन ड्रम गावठी दारू फेकून दिली. तसेच पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोन्ही गटातील महिलांचा जमाव फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या आवारात जमला होता. रात्री उशिरपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.