अमरावती - कोरोना काळात अमरावती शहरातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीवर प्रचंड ताण आला आहे. यामुळे लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य समजून घेऊन शहरात आणखी इतर स्मशानभूमी विकसित कराव्या, अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला भाजपचे नगरसेवक अजय सारसकर, स्वाती कुळकर्णी, लवलीना हर्षे आणि प्रणित सोनी उपस्थित होते.
तिसऱ्या शवदाहिनीला विरोध
शहरातील प्रमुख स्मशानभूमीत दोन शवदाहिन्या आहेत. सध्या 24 तास या स्मशानभूमीत कोरोनाने दगावणाऱ्यांवर अंत्यसंस्कार होत आहे. यामुळे स्मशानभूमी लागत असणाऱ्या नाथवादी, माधव नगर, गणेश कॉलनी या भागात प्रदूषण वाढले आहे. स्मशानातील राख लगतच्या परिसरातील घरात उडून येत आहे. या भागातील नागरिकांनी शहरात अनेक भागात असणाऱ्या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जावेत, अशी मागणी केली असताना आता या स्मशानात तिसरी शवदाहिनी उभारण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी उभारली जाऊ नये. शवदाहिनीची व्यवस्था इतर भागातील स्मशानभूमीत करून त्या स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांच्या वतीने शिवराय कुळकर्णी यांनी केली.
स्मशानभूमी संचालकांचा अट्टाहास
या परिसरातील नागरिकांचा विरोध असताना स्मशानभूमी संचालक मात्र तिसरी शवदाहिनी याच स्मशानभूमीत उभारण्याचा हट्ट करीत आहेत. या भागातील लोकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. शहरातील इतर स्मशानभूमी विकसित झाल्या तर भविष्यात शहरासाठी फायदेशीर ठरेल अशा अनेक बाबी त्यांना समजून सांगितल्या असतानाही त्यांचा अट्टाहास कायम असल्याबाबत शिवराय कुळकर्णी यांनी खंत व्यक्त केली.
पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचाही विरोध
हिंदू स्मशानभूमी लगतच असणाऱ्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेऊन लोकांनी वास्तविक परिस्थिती सांगितली. प्रभाकरराव वैद्य यांनी सुद्धा इतर स्मशानभूमीत शवदाहिनी उभारून त्या स्मशानभूमीचाही विकास साधावा, अशी भूमिका घेतल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले.
महापालिकेतही ठराव पास
या हिंदू स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी उभारू नये असा ठराव पास केला आहे. आम्ही महापालिका प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासनाला तिसरी शवदाहिनी इतर भागातील स्मशानभूमीत लावावी अशी विनंती करणार आहोत, असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकारचे व्यापाऱ्यांसोबत साटेलोटे'