अमरावती - अमरावतीमध्ये भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड व जाळपोळ झाली. भाजप नेते व माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीच दंगल घडवली व त्यासाठी मुंबईतून पैसा आला व अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांना दारू पाजून दंगल घडवली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या या आरोपानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावे नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले. त्यांना अमरावती न्यायालयात खेचणार असल्याचेही बोंडे यांनी सांगितले.
नांदेड, मालेगाव आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंद पुकारण्यात आला होता. या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागले. आंदोलनाला ज्या कोणी हिंसक वळण लावलं त्यांच्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल. मात्र शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाकडून जाणून-बुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठं षड्यंत्र आहे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस तो बदनाम व्हायला लागतो, त्यानंतर ते आपलं शेवटचं हत्यार म्हणून दंगल घडवतो, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
हे ही वाचा -Maharashtra Violence 13 नोव्हेंबरला दंगल घडविण्याचे भाजपकडून जाणून-बुजून षडयंत्र- नवाब मलिक
तसेच अमरावतीमध्ये काही तरुणांना पैसे देऊन भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगल घडवून आणली. म्हणून अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी म्हटले होते.
लवकरच याबाबत सर्व पुरावे समोर आणणार -
भारतीय जनता पक्ष सर्व मोर्चावर मागे पडलेली आहे. राज्यात त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे न राहिल्यामुळे शेवटचे हत्यार बनवून राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असून याबाबत राज्य सरकार लवकरच पुरावे समोर आणतील, असा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला आहे.