अमरावती : अमरावती जिल्हात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कालपासून 15 मेपर्यंत सात दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली. यात केवळ मेडिकल व हॉस्पिटल सुरू आहेत. यात जिल्ह्यातील दूध डेअरीसुद्धा बंद करण्यात आल्याने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध डेअरी मालक धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या लॉकडाऊन मध्ये दूध डेअरी उघडण्यास परवानगी द्या अशी मागणी केली.
दूध व्यवसायाला सूट देण्याची मागणी
निर्बंधांचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसत आहे. कारण जिल्हात अडीच लाख लिटर दूध हे वेगवेगळ्या दूध डेअरीवर जाते. सुरुवातीला दूध हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये दूध डेअरी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे दूध संकलन बंद असल्याने नागरिकांनाही दूध मिळत नाही. तर दूध बंद असल्याने आता शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे दूध डेअरीला यातून सूट देण्याची मागणी दूध डेअरी मालकांनी केली आहे.
अमरावतीत 15 मे पर्यंत लॉकडाऊन
अमरावतीत काल दुपारी बारा वाजेपासून १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे. त्यामुळे याची धास्ती घेत अमरावतीकरांनी पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या इतवारा बाजारपेठेत किराणा, भाजीपाला दूध, फळे आदी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळाले होते. दरम्यान या गर्दीत मात्र लोकांनी कोरोनाचे संपूर्ण नियमच पायदळी तुडवल्याचे दिसून आले.
जीवनावश्यक सेवा घरपोच देण्याची मुभा
या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जीवनावश्यक सेवांमध्ये मोडला जाणारा किराणा, भाजीपाला, दूध, मांस, फळे हे घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार आहे.