अमरावती : शहरात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली होती. आता मात्र शहर शांत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली असून या काळात आता शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे.
शहरात सर्वत्र शांतता -
12 आणि 13 नोव्हेंबरला हिंसाचार उफाळून आल्यावर सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी 13 नोव्हेंबरला दुपारी चार वाजल्यापासून संचारबंदी घोषित केल्यावर संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शहरातील राजकमल चौक, चित्रा चौक ,पठाण चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ ,फ्रेजरपुरा, कोल्हापुरी गेट, नागपुरी गेट, मसानगंज या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान आता शहरात वातावरण शांत झाली असताना पोलीस दलाच्या वतीने सोमवारपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल केली होती. मंगळवारपासून मात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचे नवे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
शहरात पोलीस बंदोबस्त कायम -
12 आणि 13 नोव्हेंबर रोजी शहरात उफाळून आलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 12 नोव्हेंबर रोजी मुस्लीम समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी अनेकांना अटक केली असताना आता शहरातील वातावरण शांत झाले आहे. संचारबंदीत शिथिलता आणली असताना शहरातील संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत मात्र संचारबंदी कायम आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - 'पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला' - शिवसेना