अमरावती : विदर्भात सर्वाधिक उत्पादन हे कापसाचे घेतले जाते. पश्चिम विदर्भातील यवतमाळ हा जिल्हा तर कापसासाठी प्रसिद्ध आहे. परंतु कापूस उत्पादनात यंदा देशांत मोठी घट झाल्याने कापसाचे दर सध्या वेगाने वाढत आहे. दोन आठवड्यापूर्वी ८५०० पर्यत स्थिर असलेल्या कापसाच्या बाजारपेठेत पुन्हा तेजी आली आहे. मागील आठ दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होत असून अमरावती इतिहासात पहिल्यादा शनिवारी तबल ९५०० रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी (Hike in Cotton Price) भाव मिळाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी उत्पादनात मोठी घट झाली आहे.
कापसाच्या दरात वाढ
खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक झाले आहे. यावर्षी सुरुवातीला आलेल्या अतिपावसामुळे कपाशी आणि सोयाबीनला जबर फटका बसला. कपाशीला अति पाऊस झाल्याने 20 टक्के बोंडें हे सुरवातीला सडून पडले. त्यानंतर पुन्हा कपाशीवर बोंड अळीचे सावट आल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. देशातील इतर राज्यातही मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट झाल्याने कापूस उत्पादन कमी झाले आहे. यावर्षी कापसाच्या दोन वेचणी नंतरच शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची उलंगवाडी झाली. ज्या राज्यात कापसाचे उत्पादन सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्या राज्यातही कपाशीला अधिक पावसाचा फटका बसला आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार देशभरात 40% कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आता त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होत आहे म्हणून दिवसेंदिवस कापसाचे दर वाढत आहे.
दोन ते अडीच लाख क्विंंटल कापसाची खरेदी
यावर्षी हमीभावापेक्षा खाजगी बाजारपेठेत कापसाला चांगला दर असल्याने खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी आणत आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत दोन ते अडीच लाख क्विंंटल कापसाची खरेदी झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यात संपूर्ण हंगामात दहा लाख क्विंटल पर्यंत खरेदी होते. परंतु यंदा उत्पादनात घट झाल्याने साडेसहा ते साडेसात लाख क्विंटलपर्यंत खरेदी होईल असा कापूस व्यावसायिकांचा अंदाज आहे.
उत्पादन झाले कमी
शेतकऱ्यांना एका एकरात किमान 12 ते 13 क्विंटल कापसाचे उत्पादन होणे अपेक्षित होते. परंतु, बोंड अळी आणि अतिपावसामुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन झाले आहे. त्यामुळे एकीकडे भावाने तारले असले तरी उत्पादनाने मारले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे ।भाव मिळत असला तरी उत्पादन मात्र कमी झाले आणि त्यामुळेच आमच्या मालाला भाव मिळत असल्याचा कापूस उत्पादकांनी सांगितल आहे.
हेही वाचा - Aurangabad RTO : वाहन चालकांनो सावधान, मास्क घातला नाही तर दंडाची पावती येईल घरी