अमरावती - कोरोनाच्या संकटात कोणाचीही उपासमार होऊ नये, यासाठी भुकेलेल्याना अन्न मिळावे म्हणून अमरावती शहरात कम्युनिटी किचन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि महापालिका प्रशासनाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने अनेक गरीब कुटुंबाना धान्य वितरित केले असले, तरी शहरातील भटके, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 आणि अमरावती महापालिकेने पुढाकार घेऊन कम्युनिटी किचन सुरू केले आहे. राज्य राखीव पोलीस दलाने जिल्हाधिकारी कार्यालयालगत जिल्हा कोषागार मार्गावर आजपासून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवनाची व्यवस्था केली आहे.
अमरावती महापालिका प्रशासनाने शुक्रवारपासून नेहरू मैदान येथील महापालिकेच्या शाळेत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील ज्या भागात शंभर दोनशे जण राहतात आणि त्यांची जेवणाची सोय नसेल, तर त्यांच्या भगत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिली. शहरात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी प्रशासन घेत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. यासह मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 5 रुपयात शिवथाळीही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.