अमरावती - अनलॉकनंतर अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. काल सोमवारी अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या तबल 449 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत कोरोनाने 439 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अनलॉकनंतर जिल्ह्यातील नागरिक बिनधास्त झाले आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहण्याऐवजी बिनधास्त लोकांमध्ये वावरत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या 14 दिवसात 3154 रुग्णसंख्या झालेली आहे. यामुळे प्रशासनाला नाईलाजास्तव जिल्ह्यात संचारबंदी जाहीर करावी लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात 3 हजार 154 कोरोणा रुग्ण वाढले. गेल्या पाच दिवसाची आकडेवारी बघितली तर या आकडेवारीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचेच दिसत आहे. 10 फेब्रुवारी 315, 11 फेब्रुवारी 359, 12 फेब्रुवारी 369, 13 फेब्रुवारी 376, 14 फेब्रुवारी 399 तर 15 फेब्रुवारीला हा आकडा 449 वर पोहचला आहे.
रिकव्हरी रेट 93.1 टक्के-
लोक अजूनही मास्क वापरत नसल्याचे जाणवत आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 1.86 टक्के असून, रिकव्हरी दर 93.1 टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 25 हजार 294 वर पोहोचलेली आहे. तर आतापर्यंत 24090 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. तर 1224 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
ही सुद्धा आहेत कोरोना वाढीचे कारणे-
जेव्हापासून कोरोना लस आली तेव्हापासून अमरावतीकर हे बिनधास्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात अनलॉक झाल्याने बाजारपेठेत तुंबळ गर्दी आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक असलेल्या एस टी मध्ये, रेल्वे मध्ये, शासकीय ठिकाणी, चौका-चौकात मोठी होणारी गर्दी त्यात मास्क लावण्याचे प्रमाण तोडके यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची सांख्य वाढत आहे.
रस्त्यावरील हॉटेल, हातगाड्यावर होणारी गर्दी-
अमरावती हे खवय्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात शेकडो हातगाड्यावर हॉटेलचा व्यवसाय चालवला जातो. परंतु येथे स्वच्छता पाळली जात नाही. त्याच बरोबर येथे येणारे ग्राहक शहरासह ग्रामीण भागातून येतात परंतु कोरोनाचे नियम, सोशल डिस्टंस येथे पाळल्या जात नाही. त्यात महानगरपालिका ठोस कारवाई करत नसल्याने येथूनही कोरोनाचा फैलाव होतो आहे.
काय आहे लसीकरणाची परिस्थिती-
अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १७ हजार फ्रंट लाईन वर्कर यांना कोरोनाची लस देण्यात आलेली होती. कालपासून आता लसीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे काल 100 फ्रंट लाइन कर्मचारी यांनी दुसऱ्यांदा लस टोचुन घेणे गरजेचं होतं. परंतु काल 58 लोकांनीच लस टोचल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थ मंगल'ला ३० हजारांचा दंड-
लग्न समारंभात ५० उपस्थितांची मर्यादा असतानाही त्याहून अधिक गर्दी आढळल्यास लॉन चालकांवर कारवाई करण्याची धडक महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे. त्यात आज सिद्धार्थ मंगल कार्यालयाकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत मर्यादित संख्येचे व गर्दी टाळण्याचे निकष न पाळणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. मर्यादेहून अधिक व्यक्ती असलेल्या समारंभात प्रतिव्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. लाली लॉन व व्हाईट हाऊस लॉन येथेही मोठी गर्दी आढळून आल्याने या लॉन चालकांनाही नोटीस जारी करण्यात येत आहे. त्यांनाही मोठा दंड ठोठावण्यात येत असल्याचे पालिकेचे बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा- राज्यात तयार होताहेत 25 लाख घरे!