अमरावती - शहरातील रुख्मिणी नगर परिसरात असणाऱ्या गेटलाइफ या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 3 परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोना रुग्णाच्या उपचारादरम्यान या 2 जणींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेटलाइफ रुग्णालयात शोभा नगर परिसरातील एक व्यक्ती प्रकृती ठीक नसल्यामुळे 27 मे रोजी दाखल झाली होती. गंभीर बाब म्हणजे, या व्यक्तीचा पहिला अहवाल सकारात्मक आल्यावर दुसरा नकारात्मक येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून गेटलाइफ रुग्णालयात हलवले.
या व्यक्तीचा तिसरा कोरोना अहवाल पुन्हा सकारात्मक आल्याने गेटलाइफ रुग्णालयातील डॉक्टरांची तारांबळ उडाली होती. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना या रुग्णाचा संपर्क 3 परिचारिकांसोबत सतत आला होता. यामुळे या परिचारिकांचा स्वॅब तपासणीसाठी घेऊन त्यांना गेटलाइफ रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले होते.
यापैकी 35 वर्षीय परिचारिकेला कोरोना असल्याचा अहवाल मंगळवारी सकाळी प्राप्त झाला. तर, बुधवारी सकाळी प्राप्त अहवालामध्ये 23 आणि 22 वर्षे वय असणाऱ्या इतर 2 परिचारिकाही कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी दोघी यशोदानगर परिसरातील रहिवासी आहेत तर एक 22 वर्षीय परिचारिका रुख्मिणी नगर परिसरात एका घरात भाड्याने राहते, अशी माहिती समोर आली आहे.
सध्या या 3 परिचारिकांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गेटलाइफ रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, इतर परिचारिका सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. बुधवारी गेटलाइफ रुग्णालयातील या दोन परिचारिकांसोबतच वडरपुरा परिसरात 25 वर्षांचा युवक आणि मसानगंज परिसरात 41 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.