अमरावती - शहरात नवीन तयार झालेल्या रिम्स हॉस्पिटलमधील सुरक्षा कंत्राटदाराच्या अनेक तक्रारी तेथील महिला कामगाराकडून गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते.
ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे आणि विरोध करणाऱ्या महिलांना तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकणे, त्यांचा पगार आणि पीएफ सुद्धा न देणे असे प्रकार सुरू होते. सदर कामावरून काढलेल्या महिलांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडे तक्रार करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी महिलांनी सदर कंत्राटदारास पोलीस ठाण्यात नेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.