अमरावीत - देशात सत्तेवर येण्यापूर्वी महागाई विरोधात विविध प्रकारचे जुमले जनतेसमोर ठेवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना सध्या देशातील महागाईच्या ( India Inflation ) विसर पडला आहे. महागाईमुळे जनता त्रस्त असलेल्याचे पंतप्रधानांना कळावे. तसेच, पंतप्रधानांनी निवडणूक काळात जे काही जुमले भारतीयांना दिले होते. त्याचाच वापर करत अमरावती काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात ( Congress Agitation Against Inflation ) आले.
महागाईने गाठला कळस - अमरावतीत पेट्रोलचे दर 121 रुपये लिटर आणि डिझेलचे दर 115 रुपयांवर पोहलचे आहेत. गॅस सिलेंडरचे दर सुद्धा हजार रुपयांच्यावर असून, वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. महागाईने आता कळस गाठला असून, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून महागाई आटोक्यात आणावी, अशी मागणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख ( Former Minister Sunil Deshmukh ) यांनी यावेळी केली.
इर्विन चौकात जोरदार घोषणाबाजी - इर्विन चौक येथे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या जुमला आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भोंगा लावून निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांनी महागाई संदर्भात जे काही जुमले वापरले होते. ते सर्व जुमले यावेळी भोंग्यावर वाजवून नरेंद्र मोदींनी महागाई संदर्भात केलेल्या वक्तव्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमटे आणि काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.