अमरावती - शहरात आजपासून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू (Schools Reopen in Amravati) झाली आहे. कोरोनाच्या नव्या ऑमिक्रोन या व्हेरियंटची (Omicron Variant) भीती सध्या आहे. तरीसुद्धा चिमुकले आज मोठ्या संख्येने शाळेत आले आहेत. विशेष म्हणजे पालकांनीही गेले दीड वर्ष घरातच असणाऱ्या आपल्या चिमुकल्यांना मोठ्या उत्साहात शाळेत आणले.
- चिमुकल्यांचे शाळेत स्वागत -
अनेक चिमुकले आनंदात शाळेत आले होते. या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शहरातील प्रत्येक शाळेत स्वागत करण्यात आले. शहरातील आदर्श प्राथमिक शाळा होली क्रॉस प्रायमरी स्कूल, राठी शाळा येथे चिमुकल्यांच्या स्वागतासाठी वर्गखोल्या सजवण्यात आल्या होत्या. वर्गखोल्या बाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
- कोरोना नियमांचे पालन -
चिमुकले विद्यार्थी आज शाळेत आले असताना शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करूनच प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम शाळेच्यावतीने घालून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात आला. पालकांची सहमती असेल तरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला.
- पालकांमध्येहि उत्साह -
आज पालकांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. पहिल्या दिवशी शाळा केवळ दोन तासच असल्यामुळे अनेक पालक शाळेच्या आवारातच शाळा सुटण्याची वाट पाहत बसले होते. काहीशा धास्तावलेल्या पालकांना शाळा प्रशासनाच्यावतीने घेतली जाणारी काळजी पाहून हायसे वाटले.