अमरावती - कर्तव्यदक्ष पोलीस शिपायास मारहाण केल्याप्रकरणात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. खरंतर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा देण्याऐवजी आता भाजप माझ्या मागे लागणार असे वक्तव्य करणे योग्य नाही. या अशा गुंड प्रवृत्तीच्या यशोमती ठाकूर मंत्री म्हणून सर्वसामान्यांना काय न्याय देणार, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
हेही वाचा - रामाच्या नावाने किती वर्षे राजकारण करणार? शिवसेनेची भाजपवर टीका
24 मार्च 2012 रोजी आमदार असणाऱ्या यशोमती ठाकूर यांचे वाहन अंबादेवी मंदिराच्या दिशेने असणाऱ्या एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने जात असताना या मार्गावर कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस शिपाई उल्हास रौराळे यांनी अडवले होते. यामुळे संतप्त झालेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रौराळे यांना चक्क मारहाण केली होती. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 8 वर्षांनी जिल्हा व सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी ठरवत 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाचा निर्णय आल्यावर यशोमती ठाकूर यांनी आता एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भाजपच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी न्यायालयाचा निकाल येताच यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आमदाराची गाडी अडवणाऱ्या उल्हास रौराळे यांचे कौतूक, सत्कार करण्यापेक्षा त्यांना यशोमरी ठाकूर यांनी मारहाण केली. यशोमती ठाकूर या गुंड प्रवृत्तीच्या असल्याचे आता न्यायालयाने स्पष्ट केले असताना त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा गुंड मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे शिवराय कुलकर्णी म्हणाले. पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा भाजप अध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातूरकर, संध्या टिकले, लता देशमुख, शिल्पा पाचघरे आदी उपस्थित होते.