अमरावती - लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती 2020 मध्ये जितकी गंभीर आहे, तितकी यापूर्वी कधीही नव्हती, असा आरोप भाजप नेत्यांनी गुरुवारी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पीक कर्ज द्या अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालय येथून भाजपने जिल्हा बँकेवर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ताट-वाटी वाजवून आंदोलनाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते एकत्र आलेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ताट-वाटी वाजवून शासनाचा निषेध नोंदवला. यानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून इर्विन चौक येथील जिल्हा बँकेवर धडकला. जिल्हा बँकेच्या सभागृहात निवेदिता चौधरी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीबाबत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती दिली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा धडाक्यात केली होती. नियमित कर्ज भरतात त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ, असेही शासनाने जाहीर केले. आता सरकारच्या या घोषणांना 6 महिने झालेत. मात्र, 18 लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादी दिली नाही. पहिल्या यादीत अनेक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झाले नाही. अमरावतीसारख्या शेतकरी आत्महत्नाग्रस्त जिल्ह्यात केवळ 300 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करणारा असून या प्रकाराविरुद्ध आम्ही चार दिवस विविध आंदोलन केलीत. आज जिल्हा बँकेत आम्ही धडकलो असून शेतकऱ्यांसाठी आमचे आंदोलन कायम सुरू राहील, असे निवेदिता चौधरी म्हणाल्या.
या आंदोलनात महापौर चेतन गावंडे, राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, महापालिका स्थायी समिती सभापती, राधा कुरील, नगरसेवक तुषार भारतीय, सुरेखा लुंगरे, रविराज देशमुख, माजी आमदार रमेश बुंदीले, दिनेश सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.