अमरावती - दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात एस टी महामंडळकडून होणारी तिकिटांची दरवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने हा निर्णय घेतला. महामंडाळाच्या या दिलासादायक निर्णयानंतर अमरावतीच्या प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस टी महामंडळाच्या वतीने अमरावती आगारातून दिनांक ११ ते २१ नोव्हेंबर या दहा दिवसांत जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळी काळात महाराष्ट्रातील मराठवाडा, जळगाव खान्देश, बीड, अंबेजोगाई, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, आदी जिल्ह्याकरीताही जादा बसची सेवा पुरविण्यात येणार आहे. तसेच आंतरराज्यीय सेवे अंतर्गत मध्यप्रदेश मधील भोपळ, खंडवा, आदी जिल्ह्यात जादा बस सोडण्यात येणार आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी बस-
मागील वर्षात दिवाळीला एसटी महामंडाळा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एस टी कडून पुण्यावरून येण्यासाठी ५० जादा बस लावण्यात आल्या होत्या. तर अमरावती वरून पुण्याला जायला ८० बस होत्या. परंतु यंदा कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यावरून १५ ते २० तर पुण्याकडे जाण्यासाठी ५० ते ६० गाड्यांचे नियोजन केले असल्याची माहिती अमरवती एसटी विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली आहे.