अमरावती - राजापेठ भुयारी मार्ग युद्धपातळीवर कामे करून कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी सुरू करा, असे निर्देश आमदार रवी राणा यांनी दिले आहेत. संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी भुयारी मार्गाची पाहणी केली.
राणा यांनी जाणून घेतल्या तांत्रिक बाबी
अमरावती शहराच्या दोन्ही बाजूंना जोडणारा व वाहतूक सुलभ करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा उड्डाणपूल मागील वर्षी जनतेच्या सेवेत अर्पित करण्यात आला. परंतु उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग हा स्थानिक रहिवाशांसाठी अत्यावश्यक असल्यामुळे त्यांनी या भुयारी मार्गाची पाहणी केली. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटदार यांच्याकडून तांत्रिक बाबी जाणून घेतल्या.
'10 जूनला मार्ग मोकळा करा'
या भुयारी मार्गाचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी यावेळी दिले. कुठल्याही परिस्थितीत सदर भुयारी मार्ग 10 जूनच्या आत पूर्ण करून जनतेच्या सेवेत अर्पण करण्यात यावा, असे ते म्हणाले. 10 जूनच्या आत काम पूर्ण झाले नाही, तर अधिकारी व कंत्राटदारांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.