अमरावती - मागील काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर तापमान 43.5 अंशापर्यंत नोंदवले गेले आहे. त्या पाठोपाठ अकोला जिल्ह्यातसुद्धा तापमान 42.5 पर्यंत गेले होते. त्यामुळे विदर्भात नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. दरम्यान आता या कडाक्याच्या उन्हापासून आगामी दोन तीन दिवस नागरिकांना दिलासा मिळणार आहे. असे अमरावतीच्या हवामान विभागाचे तज्ञ डॉ. अनिल बंड यांनी सांगितले आहे.
उद्यापासून 11 तारखेपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरवर येत असलेले पश्चिमी, राजस्थान आणि तामिळनाडूवर असलेले चक्राकार वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भात पाऊस पडणार आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकाच्या नुकसानाची शक्यता वर्तवली आहे . त्यामुळे या पावसामुळे उकाडा जरी कमी होत असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे.
11 तारखेपर्यंत विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र विदर्भात पुन्हा कडाक्याचे ऊन तापणार आहे. त्यानंतर 20 एप्रिल नंतर तापमान 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे.