अमरावती - जातिभेद, धर्मभेद हे सर्व बाजूला सारून ( Amravati citizens on Navneet Rana ) जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही 2019 मध्ये तटस्थ मतदार म्हणून नवनीत राणा यांना खासदार म्हणून निवडून दिले. आज मात्र हनुमान चालीसा पठणाच्या नावाखाली खासदार म्हणून नवनीत राणा जो काही प्रयोग करीत आहे ते अनाकलनीय असून बुद्धीला न पटणारा आहे, असे नागरिक ( Amravati citizens on hanuman chalisa row ) म्हणाले. आम्हाला आमच्या जिल्ह्यात नवा विकास पाहायचा आहे, अशा स्वरुपाच्या भावना सर्वसामान्य मतदारांच्या असून, या भावना प्रतिक्रियांच्या स्वरुपात सर्वसामान्य अमरावतीकरांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केल्या.
हेही वाचा - Amravati Petrol Pump : अमरावतीत पेट्रोल पंपावर उसळली गर्दी; 'हे' आहे कारण
आम्ही तटस्थ मतदार म्हणून विचार केला. 2014 मध्ये देशात एका विशिष्ट विचाराचे सरकार आले. 2019 च्या निवडणुकीत आम्ही तटस्थ मतदार म्हणून अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना मतदान केले. त्यांच्यासाठी प्रचारही केला. जिल्ह्यात विकास होईल अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून होती. डॉ. पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा हा जिल्हा असून लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विचाराप्रमाणेच वागावे, असे जिल्ह्यातील सर्व मतदारांना अपेक्षित आहे. असे असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील सर्व समस्या बाजूला ठेवून हनुमान चालीसा पठण हा जणू काही विशेष मुद्दा म्हणून धरला तो अनाकलनीय आणि बुद्धीला न पटणारा असल्याचे अॅडव्होकेट गजेंद्र सदार म्हणाले.
खासदार नवनीत राणा या संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी भूमिका नियमित घेतात. त्यांच्या भूमिकेचे कारण त्यांनी आम्हाला पटवून सांगितले तर ते आम्हाला मान्य होऊ शकेल, मात्र हनुमान चालीसा पठण हा विषय तर काही केल्या रुजत नाही. खासदारांनी मुंबईला हनुमान चालीसा पठण केले, दिल्लीतही हनुमान चालीसा पठण केले आणि आता अमरावती परत आल्यावर सुद्धा हनुमान चालीसा पठणाचा प्रयोग सुरूच ठेवला, या मागचा उद्देश सर्वसाधारण व्यक्ती म्हणून मला कळत नाही, असे देखील गजेंद्र सदार म्हणाले.
धार्मिक तेढ वाढवणारी कृती नको. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही नवनीत राणा यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे राहिलो. आज मात्र त्यांची भूमिका अजिबात पटणारी नाही. जिल्ह्यात जाती-धर्मांमध्ये भांडणे नको, हीच आमच्यासह सर्वांचीच अपेक्षा आणि इच्छा आहे. मात्र, जिल्ह्याच्या खासदारांची कृती तशी नाही. खासदारांची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी नको, असे चष्म्याचा व्यवसाय करणारे एजाज पटेल म्हणाले.
वैयक्तिक काही करा, मात्र समस्यांची दखल घ्या. हनुमान चालीसा पठण करणे किंवा नाही करणे ही बाब खासदार आणि आमदार यांची वैयक्तिक आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची सुद्धा त्यांना जाण असावी. आमच्या समस्या सुटाव्यात, बडनेरा मतदार संघाचा विकास व्हावा, याच उद्देशाने आम्ही त्यांना मतदान केले. मात्र, मतदारसंघातील अडचणींकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यांना परत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचे असेल तर त्यांनी जनतेच्या समस्यांची दखल घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे व्यवसायिक अविनाश पवार म्हणाले.
हेही वाचा - Rana Couple : विनापरवानगी रॅली काढणे राणा दाम्पत्याला भोवले; चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल