अमरावती - अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रविवारी एक दिवसाचा जनता कर्फ्यूचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व आस्थापने व दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.
हेही वाचा - इंटरनॅशनल डाॅन बरोबर संबंध असतील तर गणेश नाईक यांची एसआयटी मार्फत चौकशी करा- सुप्रिया सुळे
अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार आठवड्यातील शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी आठपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच जारी केला होता. आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सर्व दुकाने रात्री आठला बंद होतील. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स, चहा-नाश्ता, उपहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने तसेच सिनेमागृह, उद्याने, पर्यटन स्थळे रात्री आठला बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या सर्व नियमातून अत्यावश्यक असलेले औषधी दुकाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे व दवाखाने, वैद्यकीय प्रयोगशाळा व रुग्णवाहिका यांना सूट देण्यात आली आहे.