अमरावती - अमरावती शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता आठ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घेतला आहे. चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. त्याची अंमलबजावणी 23 सप्टेंबरपासून होणार आहे. यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील 275 महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
अमरावती तिसरे
नागपूर शहरात महिला पोलिसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आठ तासांच्या ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस तिसरे घटक बनले आहेत.
'सर्व पोलीस ठाण्याने हा उपक्रम राबवावा'
पोलीस दलात कर्तव्य करीत असलेल्या महिलांना बारा तास काम करावे लागते. त्यांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेकवेळा सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा 12 तासांपेक्षा अधिक वेळ कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीचा वेळ आता आठ तास केला आहे. त्यामुळे आता महिलांना चार तासांची सवलत मिळाल्याने मोठा आनंद निर्माण झाला आहे. तर सर्व पोलीस ठाण्याने हा उपक्रम राबवावा, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.