नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत नवीन संसद भवन म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जर तांत्रिक बिघाड आला नाही तर आर्थिक वर्ष 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प नवीन संसद भवनात सादर केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही तांत्रिक अडचण आल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या संसद भवनात घेण्याची शक्यता सरकारी सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरु: संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी नवीन संसद भवनात 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करू शकतात. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी जोरात सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून, जानेवारीच्या अखेरीस नवे संसद भवन पूर्णपणे तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नवीन संसद भवनात होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारीही सुरू झाली आहे.
नवीन ओळखपत्रे बनवण्याचे काम सुरु: यावर अंतिम निर्णय होणे बाकी असले तरी लोकसभा सचिवालयाने विविध पक्षांच्या खासदारांना नवीन संसद भवनात येण्यासाठी नवीन ओळखपत्रे बनवण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून, ते 14 फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन काळात मध्ये ब्रेक घेऊन 6 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालण्याची शक्यता आहे. परंपरेनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.
अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी: 1 फेब्रुवारी रोजी सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि केंद्रीय अर्थसंकल्प दोन्ही ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरज भासल्यास नवीन सभागृहाचे उर्वरित दिवसांचे कामकाज जुन्या संसद भवनात चालवता येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
संसदेच्या बाह्य सजावटीचे काम अंतिम टप्प्यात: सध्याच्या आणि नवीन संसद भवनातील कुंपण हटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या बाह्य सजावटीचे काम सुरू झाले आहे. तांत्रिक अडचण न आल्यास यावेळचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसद भवनातून सुरू होऊ शकते. काही तांत्रिक बिघाडामुळे हे शक्य झाले नाही, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या संसद भवनात घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे.
हेही वाचा: Budget 2023 बजेट 2023 केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अपेक्षा वाढल्या शेअर बाजारात येणार तेजी