मुंबई : जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे, बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 225.95 अंकांनी किंवा 0.37 टक्क्यांनी घसरून 60,806.31 वर आला. त्याच वेळी एनएसईचा 50 समभागांचा निफ्टी देखील 54.50 अंकांच्या घसरणीसह 17,875.35 अंकांवर व्यवहार करत होता.
नफा आणि तोटा असलेले शेअर्स : सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 पैकी आठ कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांचे शेअर्स तोट्यात आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय आणि मारुती सुझुकीचा समावेश आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 600.42 अंकांनी म्हणजेच 0.99 टक्क्यांनी वाढून 61,032.26 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 158.95 अंकांनी म्हणजेच 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 17,929.85 वर बंद झाला.
म्हणून शेअर बाजार घसरला : आशियाई बाजारांच्या नकारात्मक प्रवृत्तीमुळे देशांतर्गत शेअर बाजारांत सुरुवातीला घसरण झाली. सध्या जपान, चीन आणि हाँगकाँगच्या बाजारात घसरणीचा कल दिसून येत आहे. या आधी मंगळवारी युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात संमिश्र कल होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे किरकोळ संशोधन प्रमुख दीपक जसानी म्हणाले की, गुंतवणूकदार अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीमुळे चिंतेत आहेत. दरम्यान, मंगळवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,305.30 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली.
सुरुवातीच्या व्यापारात रुपया घसरला : अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी कमजोर झाला. बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात रुपया 82.90 पर्यंत घसरला. फॉरेक्स डीलर्सनी सांगितले की, अमेरिकेत आणखी दर वाढण्याच्या भीतीने डॉलर मजबूत झाला. या शिवाय देशांतर्गत शेअर बाजारातील कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळेही रुपयावर दबाव कायम आहे.
डॉलर निर्देशांक वाढला : आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 82.90 वर उघडला जो 12 पैशांची कमजोरी दर्शवित आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी रुपया 82.78 वर बंद झाला होता. सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.14 टक्क्यांनी वाढून 103.38 वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.70 टक्क्यांनी वाढून 84.98 डॉलर प्रति बॅरल झाला. दरम्यान, मंगळवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,305.30 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली.
हेही वाचा : Twitter CEO Elon Musk Favor : ट्विटरचे सीईओ ॲलोन मस्कचे ट्विट चर्चेत, भारतीयांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव