मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्राची चिंता कमी झाल्यामुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 350 अंकांवर चढला, तर निफ्टीतही भक्कम वाढ झाली. या दरम्यान, बीएसई सेन्सेक्स 352.26 अंकांनी किंवा 0.61 टक्क्यांनी वाढून 57,987.10 अंकांवर पोहोचला. एसई निफ्टी 124 अंकांनी किंवा 0.73 टक्क्यांनी वाढून 17,109.60 वर होता.
युरोप, अमेरिका बाजार तेजीत : 30 शेअर्सवर आधारित, 24 सेन्सेक्स शेअर्स नफ्यात व्यवहार करत होते. तर सहा तोट्यात होते. त्याच वेळी निफ्टीचे 39 शेअर्स नफ्यात होते, तर 11 शेअर्सचे नुकसान झाले. तत्पूर्वी, सलग पाच दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. गुरुवारी युरोप आणि अमेरिकेतील बाजार चांगल्या वाढीसह बंद झाले. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निव्वळ विक्री केली. काल त्यांनी 282.06 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
रुपया 25 पैशांनी वधारला : जागतिक बाजार तसेच देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 25 पैशांनी वधारून 82.51 वर पोहोचला. आंतरबँक परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया 82.50 वर मजबूत झाला. मात्र त्यानंतर तो थोडा घसरून 82.54 वर आला. काही काळानंतर रुपया 25 पैशांची वाढ नोंदवत 82.51 वर व्यवहार करत होता.
डेव्हलपर्सला मागणी : जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या नोकरकपातीच्या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञान डेव्हलपर्सला मात्र भारतात सर्वात जास्त मागणी असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. विशेषत: जे डेव्हलपर्स वेब ऍप्लिकेशन्सचे फ्रंट - एंड आणि बॅक - एंड डिझाइन विकसित करू शकतात, अश्या डेव्हलपर्सला देशात अधिक मागणी आहे. जगभरात मंदीसदृष्य परिस्थिती असूनही भारतातील नावाजलेल्या 20 कंपन्यांपैकी 15 कंपन्यांमध्ये अद्याप तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे हा अहवाल सांगतो.