मुंबई : गौतम अदानी यांच्या अदानी समुहाच्या शेअर्स पाठोपाठ आता योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलि फूडसच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. गेल्या एक आठवड्यापासून पतंजलि फूडसच्या शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरु आहे. पतंजलितील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ७ हजार कोटींचे नुकसान झाले आहे.
पतंजलिचे शेअर्स आणखी घसरण्याची शक्यता : विशेष म्हणजे गेल्या तिमाहीत पतंजलि फुड्सचा नफा 15 टक्क्यांनी वाढून 269 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा 234 कोटी रुपये होता. आता पतंजली फूड्सचा महसूल 26 टक्क्यांनी वाढून 7,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीचा महसूल 6,280 कोटी रुपये इतका होता. हिंडेनबर्गच्या अदानींवरील अहवालामुळे सध्या शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. येत्या काही दिवसात पतंजलिचे शेअर्स आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
अदानींच्या व्हॅल्युएशनमध्ये 85 टक्यांची घसरण : गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल आला त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटींनी कमी झाले आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाचे मार्केट कॅप 19.2 लाख कोटी रुपये होते. शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम अदानींच्या नेटवर्थवर झाला आहे. एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकल्या गेले आहेत. ज्या दिवशी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाला त्या दिवशी अदानी समूहाच्या व्हॅल्युएशन मध्ये 85 टक्यांची घसरण झाली. दुसर्या दिवशी अदानी समूहाशी संबंधित संस्थांचे बाजार भांडवल सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी घसरले.
अदानींच्या रेटींगवरही परिणाम : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे समूहाच्या भांडवल उभारणीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने दिला आहे. अन्य रेटिंग एजन्सी फिचने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या रेटिंगवर अद्याप कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकन फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील गटावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत सहभाग असल्याचा उघड आरोप केला आहे. कंपनीच्या या आरोपानंतर समूह कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.
हेही वाचा : Hindenburg Research Adani : 10 दिवसांत तब्बल 52 अब्ज डॉलर्सचे नुकसान! अदानी समुहाची अशी झाली पडझड