नवी दिल्ली - सलग चार महिने घाऊक बाजारपेठेतील महागाईचे घसरलेले प्रमाण पुन्हा वाढले आहे. घाऊक बाजारपेठेत महागाईचा दर ऑगस्टमध्ये ०.१६ टक्क्याने वाढला आहे. अन्न आणि उत्पादित वस्तूंमधील दर वाढल्याने घाऊक बाजारपेठेत ही महागाई वाढली आहे.
घाऊक बाजार किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) सलग चौथ्या महिन्यांत घसरला आहे. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. घाऊक बाजार किंमत निर्देशांकात एप्रिलमध्ये १.५७ टक्क्यांची तर मे महिन्यात ३.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर, जूनमध्ये १.८१ टक्के व जुलैमध्ये ०.५८ टक्क्याची डब्ल्यूपीआयमध्ये घसरण झाली.
ऑगस्टमधील घाऊक बाजारामधील महागाईचा दर लक्षात देशातील वार्षिक महागाई दर हा ०.१६ टक्के झाला आहे. तर, गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये तो १.१७ टक्के होता.
अन्नाच्या वर्गवारीत ऑगस्टमध्ये महागाईचा दर हा ३.८४ टक्के होता. तर, बटाट्याच्या घाऊक बाजारपेठेतील महागाईचा दर हा ८२.९३ टक्के राहिला आहे. भाजीपाल्यामधील महागाईचे प्रमाण हे ७.०३ टक्के राहिले आहेत. तर कांद्याच्या महागाईच्या दरात ३४.४८ टक्क्यांची घसरण झाली आहे.
इंधन आणि ऊर्जा यामधील महागाईत ऑगस्टमध्ये घसरण होऊन ९.६८ टक्क्यांची नोंद झाली आहे. जुलैमध्ये इंधन आणि उर्जामधील महागाईचे प्रमाण हे ९.८४ टक्के होते. उत्पादित वस्तूंमधील महागाईचे प्रमाण घसरून ऑगस्टमध्ये १.२७ टक्के झाले आहे. तर जुलैमध्ये ०.५१ टक्के उत्पादित वस्तूंचे प्रमाण झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरणात रेपो दर हा स्थिर ठेवला होता. आगामी महिन्यांत महागाई वाढण्याचा अंदाजही आरबीआयने व्यक्त केला होता.